मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे सातत्यपुर्ण आरोग्यसेवा..

24

मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे सातत्यपुर्ण आरोग्यसेवा..

चंद्रपुर/महाराष्ट्र

 दि. 30 नवंबर 2022

सविस्तर बातमी:-  चंद्रपूर २९ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाद्वारे ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातुन चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. प्राथमिक शहरी आरोग्य केंद्र हे भारतातील आरोग्यसेवेतील सर्वात खालचे एकक आहे. प्रत्येक नागरीकाला किमान आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात येते. रोगांचा प्रतिबंध,आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे हे प्राथमिक आरोग्यकेंद्राचे मुख्य कार्य आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या काळात मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे उच्च रक्तदाबाचे एकुण ११०३६, मधुमेहाचे ६५२६ तर सद्यस्थितीत क्षयरोगाचे २३, कुष्ठरोगाचे एकुण ३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे मोफत औषधोपचार देण्यात आला आहे.

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात आली

चंद्रपूर महानगरपालिकेचे इंदिरा नगर, रामनगर, बालाजी वार्ड, बगड खिडकी, बाबुपेठ, भिवापूर सुपर मार्केट, दे.गो. तुकूम असे एकुण ७ शहरी प्राथमीक आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, अधिपरिचारीका,क्लर्क,डेटा एन्ट्री ऑपरेटर, फार्मसिस्ट,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आशा वर्कर असे मिळुन साधारणतः १५ ते २० कर्मचारी आहेत. शहरातील लोकसंख्या लक्षात घेऊन सर्व भागात आरोग्य सुविधा पुरविता येतील किंवा प्रत्येक भागातील नागरीकांना येणे सोयीचे होईल या दृष्टीने शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. डॉ. वनिता गर्गेलवार या मुख्य वैद्यकीय अधिकारी तर डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत, डॉ.जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा,डॉ.योगेश्वरी गाडगे, डॉ.अर्वा लाहिरी,डॉ. प्राची खैरे या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदर आरोग्य केंद्रांचा भार असुन चांगली आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने हे सर्व वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी कार्यरत आहेत.

प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमार्फत विविध वैद्यकिय सेवांची उपलब्‍धता करण्यात येते जसे बाहयरुग्‍ण तपासणी व औधोपचार,समुपदेशन,  प्रयोगशाळा सेवा, विविध राष्‍ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्‍याण कार्यक्रमांतर्गत सेवा, १४४ बाह्य लसीकरण सत्रा मार्फत ०-५ वर्ष बालकांचे लसीकरण, कृष्टरोग,क्षयरोग, उच्च रक्तदाब,मधुमेह असलेल्या रुग्‍णांची तपासणी व उपचार, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य सत्र,जोखमी च्या गरोदर मातांची तपासणी व पाठपुरावा,आरोग्य विषयी विविध योजना अमलबजावणी साठी  लाभार्थी यांना प्रवृत्त करणे, शाळां मधे जाऊन लसीकरण करणे, अशा विविध आरोग्‍य सेवा दिल्‍या जातात. याशिवाय कोविड चाचणी व लसीकरण पण करण्यात येते.

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवा :

१. माता मृत्यू आणि बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरता आखलेले सर्व राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे.

२. हिवताप,हत्तीरोग,क्षयरोग, ,कुष्ठरोग मोहीम, जंत नाशक मोहीम, पल्स पोलिओ मोहीम,पावसाळ्यात साथरोग नियंत्रणसाठी दररोज कंटेनर सर्वेक्षण,अतिसार

    पंधरवाडा,स्तनपान विषयी जनजागृती,पोषण आहारविषयी मार्गदर्शन.

३. गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर लागणारी संदर्भ सेवा व आरोग्य सेवा पुरवणे,

४. शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी.

५. हागवणीसारख्या सांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व उपचार.

६. संततिनियमनाच्या सेवा, उष्माघाापासून बचाव साठी जनजागृती,विविध रोगांच्या प्रतिबंधासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वेळोवेळी आरोग्य प्रशिक्षण देणे,बाह्य आरोग्य शिबिरे घेणे इत्यादी कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राबवले जातात.

 

प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ओपीडीत रुग्णांची तपासणी व उपचार तर करतातच परंतु :

१. त्यांच्या कार्यक्षेत्र अंतर्गत येणारे वॉर्ड,शाळा व अंगणवाडयांना भेट देणे,बाह्य लसीकरण सत्रात आरोग्य सेविकेच्या कामावर लक्ष ठेवणे, आशाताईंच्या कामावर देखरेख ठेवणे,वेळोवेळी आरोग्य सेविका आणि आशाताईंच्या कामाचा आढावा घेणे,सर्व आरोग्याविषयी कामांची वेळोवेळी शासनाच्या पोर्टल वर नोंदी अद्यावत करवून घेणे,विविध राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावी पणे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून कृती आराखडा तयार करणे ही देखील त्यांची कामे आहेत.

२. या व्यतिरिक्त वेळोवेळी होणाऱ्या बैठकांना,प्रशिक्षणाला उपस्थित राहणे, महानगरपालिका हद्दीतील सर्व गर्भपात केंद्र, सोनोग्राफी केंद्र यांची दर तिमाही

तपासणी करणे,सर्व नर्सिंग होम, क्लिनिक यांची तपासणी,बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करणे व वैद्यक-कायद्याशी संबंधित कामे करणे,सर्व आरोग्य विषयी कामाचे, मोहीमेचे पर्यवेक्षण,मातामृत्यू व बालमृत्यू झाल्यास त्याचे अन्वेषण करणे,शासन स्तरावर वेळोवेळी रिपोर्ट करणे या त्यांच्या इतर जबाबदा-या आहेत.

विशेष बाब ही की या सर्व आरोग्य केंद्रानं मार्फत कोविड महामारीत न थकता,जीवाची पर्वा न करता अविरत सेवा देण्यात आली.