50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो गौणखनीज वाहून नेणा-या वाहनांना

42
50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो गौणखनीज वाहून नेणा-या वाहनांना
50 हजार रुपयांपर्यंत दंड
 
Ø 1 जानेवारी 2024 पासून वाढीव दंडाची तरतुद
 
 चंद्रपुर/महाराष्ट्र

दि .04 जनवरी 2024

रिपोर्टर :- रमाकांत यादव जिल्हा प्रतिनिधि ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
 
सविस्तर बातमी:-चंद्रपुर जिल्ह्यात कोळसा, राख, विटा, वाळू, तसेच गौण खनीजाची वाहतूक करणारे वाहन ताडपत्रीने न झाकल्यास या वाहनांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. या वाढीव दंडाची तरतुद 1 जानेवारी 2024 पासून सुरू झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांद्वारे होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी कोळसा, राख, विटा, वाळू, आदी गौणखनीज वाहतूक करणा-या वाहनांनी सदर माल ताडपत्रीने न झाकल्यास वाहनावर परवाना निलंबनाची विभागीय व दंडनीय कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या  बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.
कोळसा, राख, विटा, वाळू, तसेच गौण खनीजाची वाहतूक करणा-या वाहनास ताडपत्री कव्हरने न झाकून वाहतूक केल्यास पहिला गुन्हा 10 दिवस परवाना निलंबन किंवा 10 हजार रुपये दंड,  दुसरा गुन्हा 20 दिवस परवाना निलंबन किंवा 20 हजार रुपये दंड आणि तिसरा गुन्हा 50 दिवस परवाना निलंबन किंवा 50 हजार रुपये दंड आकारला जावू शकतो, याची सर्व वाहन मालकांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.