अतिक्रमणाविरोधात आरटीओ,पोलीस प्रशासन व मनपाची धडक कारवाई

157

अतिक्रमणाविरोधात आरटीओ,पोलीस प्रशासन व मनपाची धडक कारवाई

१० चार चाकी वाहनांवर दंड,७ दुचाकी वाहने जप्त
इतर अतिक्रमणधारकांना २४ तासाची मुदत

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 26 नवंबर 2023
रिपोर्ट :- रमाकांत यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, जिला संवाददाता

सविस्तर बातमी चंद्रपूर २३ नोव्हेंबर – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय,पोलीस प्रशासन,वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन नागपूर रोडवर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
शहरातून नागपुरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग करणाऱ्या नागरिकांची वाहने थोड्या वेळापुरती वाहने दुकानासमोर उभी राहतात मात्र विक्री करणाऱ्यांची वाहने पुर्ण वेळ रस्त्यावर उभी राहतात यामुळे या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात घेऊन ८ ते १० चारचाकी वाहनांवर दंड तर पल्सर,पॅशन – प्रो,अ‍ॅक्टिव्हा अश्या ७ दुचाकी जप्त करण्याची कारवाई आरटीओ मार्फत करण्यात आली असुन जोपर्यंत दंडाचा भरणा होणार नाही तोपर्यंत या वाहनांची विक्री होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे फुटपाथवर छोटी हातगाडी,मोठे ठेले उभे करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना २४ तासांच्या आत त्यांचे अतिक्रमण हटविण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन न हटविल्यास छोटे – मोठे ठेले व त्यांचे साहीत्य जप्त करण्यात येणार आहे. हे विक्रेते येणाऱ्या ग्राहकांना बसण्यास रस्त्यावर खुर्च्या ठेवतात त्यामुळे वाहतुकीस उपलब्ध रस्त्याचे प्रमाण आपसुकच कमी होते त्यामुळे पुढील २४ तासानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
नागपुर रोडवरील जे जुनी चार चाकी व दुचाकी विक्री करणारे स्थायी दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर कोणतेही वाहन विक्रीकरिता लावु देऊ नये,वाहन विक्री करावयाची असल्यास विक्रीकरिता स्वतः जागा उपलब्ध करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. सदर कारवाई सहायक आयुक्त सचिन माकोडे,वाहतुक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,अतिक्रमण निर्मुलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.