राष्ट्रीय महामार्गावर AGIPL च्या चुकीमुळे अपघाताचा धोका

29

🛑 राष्ट्रीय महामार्गावर सर्विस रोड निकृष्ट बांधकामामुळे मोठ्या अपघाताची शक्यता

🛑 कंत्राटदार AGIPL कंपनीकडून वाहतूक आणि बांधकाम कामात सुरक्षा नियमांची पायमल्ली

◾ साकोली / महाराष्ट्र
Wed. 05. 07. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

📕 सविस्तर बातमी | साकोली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील ग्राम मुंडीपार ते जांभळी फाटा पर्यंत निर्माणाधीण उड्डाणपूलाचे बांधकाम संथगतीने सुरू असुन पावसाळ्यापूर्वीच सर्विस रोडची दुर्दशा झाली आहे. या दुर्दशेमूळे महामार्गावरील वाहतूक अवरुद्ध होत असून भयंकर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उड्डाण पूलाच्या बांधकामात कंत्राटदार एजीपीआयएल कंपनी व्यवस्थापनाकडून अनेक गैरप्रकार होत असल्याचे चित्र आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे, बांधकाम कंत्राटदार एजीपीआयएल कंपनीकडून वाहतूक आणि बांधकाम कामात सुरक्षा नियमांची पायमल्ली केली जात आहे. एजीपीआयएल कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराची माहिती संबंधित विभागाला असून, अनियमिततेच्या अनेक तक्रारी संबंधित विभागाकडे करण्यात आल्या आहेत, मात्र मोठी कंपनी असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा संबंधित विभागाच्या (एनएचएआय) अधिकारी व कर्मचाऱ्यांत आहे.
हा परिसर जंगल व्याप्त आहे, वन्य प्राणी महामार्गावर केव्हाही येतात, त्यांच्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. वन कायद्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने ७०० मीटर उड्डाणपुलाच्या चौपदरी महामार्गाला मंजुरी मिळाली. आणि महामार्गाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. निविदेत मंजूर प्रस्तावित बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर आणि बांधकामात वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या डस्टचा वापर यामुळे उड्डाण पूलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे ही धूळ रस्त्यावर उडत आहे. धुळीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने नियमानुसार बांधकामासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कंपनी व्यवस्थापनाकडून सर्व्हिस रोड निकृष्ट दर्जाचे तयार करण्यात आले., त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या जड वाहतुकीला फटका बसत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नेहमीच वाहतूक अवरुद्ध होते. सव्‍‌र्हिस रोडवरील मोठ्या खड्ड्यांमुळे दूचाकी वाहनधारकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. दुहेरी वाहने मोठ्या मुश्किलीने बाहेर पडतात.
मोटारसायकलस्वार जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत.वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत आहे. बांधकामामुळे सर्व्हिस रोडच्या दोन्ही कडा कमकुवत झाल्या आहेत. सर्व्हिस रोडवरील खड्डे अस्ताव्यस्त भरले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चुरीमुळे दुचाकी वाहने घसरून अपघाताचे बळी ठरत आहेत. खड्ड्यात फक्त डस्ट टाकला जातो आणि तो एका दिवसात खड्ड्यातून बाहेर येतो. राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई ते कलकत्ता येथे दररोज हजारो वाहने ये-जा करतात या वाहनांमधून सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळतो. मात्र रस्त्यांसारख्या अत्यावश्यक सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदार एजीपीआयएल कंपनी व्यवस्थापनाला वन्यप्राणी व रहदारीच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.