पूरामुळे झालेल्‍या शेतपिकांचे वेकोलिने नुकसानभरपाई द्यावी

33

पूरामुळे झालेल्‍या शेतपिकांचे वेकोलिने नुकसानभरपाई द्यावी

शिवसेना महिला आघाडी व बेलसनी येथील शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि: 24 अगस्त 2022       

सविस्तर बातमी चंद्रपूर : वेकोलिने वर्धा नदीच्या काठावर टाकलेल्‍या मातीच्‍या ढिगाऱ्यांमुळे पुराचे पाणी बेलसनी येथील शेतकर्यांच्या शेतीत शिरल्‍याने संपूर्ण पिके वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. याकरिता वेकोलीच सर्वस्वी जबाबदार असल्‍याने शेतपिकांची नुकसानभरपाई वेकोलीने द्यावी, अशी मागणी जिल्‍हाधिकारी, वेकोलि महाप्रबंधक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे शिवसेना महिला आघाडी व बेलसनी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

 

वेकोलीने वर्धा नदीच्या काठावर मातीचे ढिगारे बनविले..

  • चंद्रपूर तालुक्‍यातील मौजा बेलसनी येथील गावकऱ्यांचा मूळ व्‍यवसाय शेती आहे. त्‍यांच्या उदरनिर्वाहाचे शेती हेच मुख्य साधन असून कुटुंबांचे जीवनमान शेती व्‍यवसायावर अवलंबून आहे. मौजा बेलसनी येथे १८, १९, २० जुलै आणि ८, ९, १० व ११ ऑगस्ट २०२२ ला वर्धानदीला पूर आल्‍याने शेतपिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. वेकोलीने वर्धा नदीच्या काठावर मातीचे ढिगारे बनविले. विरुध्द दिशेला बेलसनी गाव व शेती आहे. वर्धा नदीच्या पुराचे पाणी वेकोलीच्‍या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे विरुध्द दिशेला येत असल्यामुळे शेतीसह शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच शिवसेना महिला आघाडीच्‍या जिल्‍हा संघटीका उज्‍वला नलगे यांनी गावाची व शेतीची पाहणी केली. हे सर्व वेकोलिने वर्धा नदीच्या काठावर टाकलेले मातीमुळे घडत आहे. त्यामुळे याकरिता वेकोलीच सर्वस्वी जबाबदार आहे. मौजा बेलसनी येथील शेती व शेतपिकांची झालेल्या नुकसानीस वेकोली कारणीभूत असल्यामुळे वेकोलीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्‍या जिल्‍हा संघटीका उज्‍वला प्रमोद नलगे व बेलसनी येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सदर मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्‍हाधिकारी, वेकोलि महाप्रबंधक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलेले आहे. यावेळी परशुराम लोडे, प्रकाश विधाते, देविदास सावे, शंकर कोडापे, युवासेवा शाखाप्रमुख अजय मिलमिले, युवासेना विभाग प्रमुख सचिन लोडे, शिवसैनिक भास्‍कर ठावरी, माजी तालुकाप्रमुख रजनी झाडे, किरण जुनघरे व गावकऱ्यांची उपस्‍थिती होती.