इरई नदीचे खोलीकरण व इतर कामांना गती द्या – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

68

इरई नदीचे खोलीकरण व इतर कामांना गती द्या – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि.29 मार्च 2022

सविस्तर बातमी:- चंद्रपूर, दि. 29 मार्च :  इरई नदीचे खोलीकरण तसेच पूर संरक्षणात्मक कामांना शासनाने मंजूरी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे आवश्यक आहे. कारण खोलीकरण करून गॅबियन बंधारे बांधले तर नवीन गाळ नदीच्या पात्रात येणार नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तात्काळ सर्व्हे करून कामाला गती द्यावी, अशा सुचना राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात इरई नदीच्या कामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठे, सा.बा. विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पी.एन.पाटील, कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे, एस.एस.दाणी, श्री. कुंभे आदी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

  • खोलीकरण करून इरई नदीचा गाळ काढणे सुरू असले तरी या कामाला गती देणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सात दिवसांत सर्व्हे करा.  तसेच खोलीकरण आणि पूर संरक्षणात्मक कामांचा संपूर्ण आराखडा तयार करून शासनाकडे त्वरीत पाठवा. नदी पात्राचे दोन्ही तट समतोल करणे, पावसाळ्यात नव्याने गाळ येऊ नये म्हणून गॅबियन बंधा-यांची निर्मिती करणे, संरक्षण भिंत आदी कामे करायची आहेत. या कामांना वेळ होऊ नये म्हणून अंदाजपत्रक सादर करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

कुटुंबातील सदस्याला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे

  • एकोना व केपीएल कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्तांना / स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात पालकमंत्री म्हणाले, प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या कुटुंबातील सदस्याला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे. कुटुंबातील सदस्य नोकरीस पात्र नसेल तर त्याप्रमाणात मोबदला मिळणे गरजेचे आहे. प्रकल्पग्रस्तांची समस्या सोडवून समाधानकारक तोडगा काढला जाईल, असेही पालकमंत्री यांनी सांगितले.   यावेळी त्यांनी ‘वढा’ तीर्थक्षेत्र पर्यटन विकास संदर्भातसुध्दा आढावा घेतला.